गंगापूर, (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रायपूर येथील स्मशानभूमी परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने समाजसेवक अशोक कितीकर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. दिवंगत जनार्दन आबा कीर्तीकर यांच्या स्मरणार्थ विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात नवनाथ कीर्तीकर, गौरव कीर्तीकर, आदित्य कीर्तीकर, अरविंद कीर्तीकर, सम्राट मच्छिंद्र कीर्तीकर यांच्यासह गावातील नागरिक व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी अशोक कितीकर यांनी सांगितले की, स्मशानभूमी परिसर हिरवागार व्हावा, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना छायादार व स्वच्छ वातावरण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अशोक कितीकर यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. गावात अशा सामाजिक उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.













